जालना-अंबड महामार्ग झाडांअभावी बोडखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:41 AM2018-11-25T00:41:41+5:302018-11-25T00:41:57+5:30
अंबड जालना या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या ८६१ झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / जामखेड : अंबड जालना या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या ८६१ झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला आहे.
आधीच जिल्ह्यात वृक्षाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. गत चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांनी केला आहे. असे असतांना सुध्दा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन संपादीत करून त्यावरील मोठे वृक्ष तोडण्यात येत असल्याने परिसर भकास झाला आहे. एकीकडे शासन वृक्ष अभियान राबवून वृक्ष लागवड करावी, यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून जनजागृती करते. तर दुसरीकडे उभी असलेल्या मोठ्या वृक्षाची कत्तल करण्यात येत आहे. यामुळे शासनाचा दुप्पटीपणा दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमीतून तीव्र नाराजीचा सूर आहे.
राज्य सरकार एकीकडे 'झाडे लावा' 'झाडे जगवा' असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महाकाय वृक्ष तोडण्यात येत आहे. पर्यावरणाचा विचार करता या मार्गावरील वृक्षाची कत्तल न करता महाकाय वृक्षाचे संगोपन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमीसह परिसरातील नागरिकातून होत आहे.
दरम्यान, वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.