सदोष मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:06 PM2017-11-20T23:06:03+5:302017-11-20T23:06:12+5:30

महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील पाच विभागांत नवीन पद्धतीचे १६ हजार फ्लॅश मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे या मीटरद्वारे अधिकचे वीजबिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत

Troubles with customers due to faulty meter | सदोष मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप

सदोष मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप

googlenewsNext

जालना : महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील पाच विभागांत नवीन पद्धतीचे १६ हजार फ्लॅश मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे या मीटरद्वारे अधिकचे वीजबिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. विशेष म्हणजे यातील सुमारे पावणेतीनशे मीटर विशिष्ट प्रकारच्या रिमोटमुळे बंद होत असल्याचे समोर आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून हे उघडकीस आले आहे. महावितरणने वर्षभरापूर्वी जालना शहरासह जालना ग्रामीण, भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर उपविभागात १६ हजार ३७५ नवीन पद्धतीने फ्लॅश मीटर बसविले होते. वीज युनिटच्या अचूक नोंदीसाठी हे मीटर उपयुक्त असल्याचे बसविताना सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या मीटरबाबत ग्राहकांमधून तक्रारी यायला सुरुवात झाली. मीटर बंद पडणे, विजेचा वापर सुरू असताना अधिकच्या रीडिंंगची नोंद होणे या प्रकारांमुळे ग्राहकांचे वीजबिल कमी होण्याऐवजी वाढत असल्याच्या अनेक तक्रारी महावितरणला प्राप्त झाल्या आहेत. या फॉल्टी मीटरमुळे अनेक ग्राहकांना सरासरी वापराचे वीजबिल दिले जात आहे. जालना शहर व ग्रामीण उपविभागात बसविलेल्या अकरा हजार ८४७ पैकी ३९८ मीटरमध्ये
तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी २४६ मीटरला विशिष्ट पद्धतीच्या रिमोटने चालू व बंद करून वीजबिलात चोरी केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. अन्य उपविभागांत बसविण्यात आलेल्या फ्लॅशमीटरबाबत अनेक तक्रारी येत आहेत. भोकरदन, बदनापूर आणि जाफराबाद उपविभागातील अनुक्रमे ४७, १७ व १८ मीटरबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर एकूण २८३ मीटरमध्ये रिमोटच्या माध्यमातून तांत्रिक छेडछाड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीजग्राहक आणि महावितरणमध्ये वीज बिलावरून वाद निर्माण झाल्याने वीजबिलाच्या आठ प्रकरणांमध्ये ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये सुनावणी सुरू आहे. एकंदरीतच चांगल्या सुविधेसाठी बसविण्यात आलेले फ्लॅश मीटरमुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे.
--------------
फ्लॅशमीटरबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने आता अशा पद्धतीचे मीटर बसविणे बंद करण्यात आले आहे. तसेच बसविण्यात आलेले बहुतांश मीटर बदलून देण्यात येत आहेत.
- अशोक हुमणे, अधीक्षक अभियंता, महावितरण.

Web Title: Troubles with customers due to faulty meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.