उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:16 PM2023-10-25T13:16:03+5:302023-10-25T13:17:18+5:30

दोन दिवसांत गुन्हे मागे घेणार होता, ते घेतली नाही अजून, आरक्षण कधी देणार ?

Troubleshooter Girish Mahajan's phone call before the fast; Manoj Jarange replied by asking for the answer | उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

अंतरवाली सराटी (जि.जालना): मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दाखल गुन्हे मागे घेण्यासह इतर मागण्यांबाबतही शासन सकारात्मक आहे. परंतु, आपण आमरण उपोषण करू नये, अशी विनंती महाजन यांनी केली. परंतु,या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.


महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शासनाला दिलेल्या ४० दिवसांची मुदत संपली आहे. यामुळे ४१ व्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचे रूपांतर पुन्हा आमरण उपोषणात केले आहे. सरकारने ४१ दिवसानंतरही मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, पण कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही जरांगे यांनी केले. दरम्यान, उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. महाजन यांनी आणखी वेळ मागितला मात्र, जरांगे यांनी आता थांबणार नाही, आरक्षणाचा कागदच घेऊन या असे आवाहन करत उपोषण सुरू केले.

मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद: 

मनोज जरांगे पाटील: आम्ही तुमचा सन्मान ठेवला, आमचा समाज काही चुकला नाही. आम्ही गरीब नाहीत का? आम्ही निकष पार केले नाहीत का? आमचे काय चुकले ते सांगा. 

गिरीश महाजन: मुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेऊन सांगितले.पण मी राजकारण करणार नाही.  मागच्या वेळी आपणच दिले आरक्षण, त्यानंतर काय झालं ते माहीत आहे.  चांगला निर्णय होईल.तुम्ही थोडे थांबा. टोकाचा निर्णय घेऊ नका. कायम स्वरूपी आरक्षण मिळत असेल तर थोडा वेळ द्या.

मनोज जरांगे पाटील: पहिल्या समितीबद्दल मी बोलत नाही. कायद्यात टिकणारं आरक्षण देतो असं तुम्ही म्हणाला होता. तुम्ही एक महिना मागितला. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले. अजूनही आरक्षण दिलं नाही.

गिरीश महाजन:  शिंदे समिती काम करत आहे. मार्ग निघेल.

मनोज जरांगे पाटील: ते वर्षानुवर्ष काम करतील. आम्ही का फाश्या घ्याव्यात का? दोन दिवसात तुम्ही गुन्हे मागे घेणार म्हटले होते. तेही तुमच्याकडून झालं नाही. तुम्ही आरक्षण काय देणार?

गिरीश महाजन: तेही सर्व काम सुरू आहे. आपल्या हातचं काम आहे. पोलिसांना आदेश दिले आहेत. आंदोलकांना कुणाला कोर्टात आणि पोलीस ठाण्यात बोलावलं नाही. ते काम लगेच होईल.

मनोज जरांगे पाटील: दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हटले होते ना…

गिरीश महाजन:  तसं नाही. दोन दिवसात होत नाही. सर्व तांत्रिक बाजू तपासाव्या लागतात. आंदोलकांना पोलीस स्टेशन आणि कोर्टात बोलावत नाही. याचा अर्थ गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.

मनोज जरांगे पाटील: आंदोलन सुरू आहे म्हणून आमच्यावरचा डाव तसा ठेवला आहे का?

गिरीश महाजन:  नाही नाही तसं नाही. तसा हेतू नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. या सरकारला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे.

मनोज जरांगे पाटील: १६ जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्याबद्दल सरकारने साधी सहानुभूती दाखवली नाही.

गिरीश महाजन: मी नांदेडला मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी बोललो. त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील: तुम्ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्या. ज्यांनी आत्महत्या केली त्यांना भरपाई देण्याचे आदेश कलेक्टरला द्या.

गिरीश महाजन:  नियमाप्रमाणे मदत देणारच आहोत. कदाचित मदत दिली गेली असेल.

मनोज जरांगे पाटील: नाही दिली. त्यांचे मुलं बाळं उघड्यावर पडलीत. त्यांना मदत करा. त्यांचं कल्याण तरी होईल.

गिरीश महाजन: मुलांच्या कुटुंबीयांना मदत देणार. त्यांच्या पाठी आपण आहोत. फक्त कुणीही आत्महत्या करू नका, असं आवाहन करा.

मनोज जरांगे पाटील: आत्महत्या करू नका म्हणून मी वारंवार आवाहन करतच आहे. अंतरवलीत आमची सभा झाली. त्यावेळी शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना सरकारी मदत द्या.

गिरीश महाजन: करू करू. आपण त्यांना मदत करू. फक्त विनंती आहे. तुम्ही उपोषणाचा निर्णय थोडा थांबवा. आपण मार्ग काढू. तुम्ही टोकाची, आमरण उपोषणाची भूमिका घेऊ नका. हवं तर साखळी उपोषण करा. तुम्हाला आरक्षण शंभर टक्के द्यायचं आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून देतो. दोन दिवसात तुमचे इतर प्रश्न मार्गी लावतो. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या हाताने चांगलं काम होईल. टिकेल असं आरक्षण द्यायचं आहे. भावनेच्या भरात काही देता येणार नाही. तसेच कुणी त्याला चॅलेंज करणार नाही, असं आरक्षण द्यायचं आहे.

मनोज जरांगे पाटील: आपली मागणी कोर्टाची नाहीच.

गिरीश महाजन:  कोर्टात टिकलं पाहिजे, असं आरक्षण द्यायचं आहे. मला राजकारणावर बोलायचं नाही. तुम्ही थोडा विचार करा. बाकीच्या दोन तीन गोष्टी आज करून घेतो.

मनोज जरांगे पाटील: आम्ही आंदोलन केलं तर धाक दाखवण्यासाठी केसेस ठेवल्या आहेत का?

गिरीश महाजन: तसं बिल्कूल नाही. ते काम अंतिम टप्प्यात आहे. ते करूच.

मनोज जरांगे पाटील: दीड महिन्यापासून अंतिम टप्पाच सुरू आहे. कुठपर्यंत अंतिम टप्पा आहे? मी राजकीय लोकांशी बोलणार नाही. उपोषणाला अर्धा तास आहे म्हणून तुमच्याशी बोलतो. मी थांबणार नाही. माझ्या जीवाचं काय करायचं? मी तुमच्याशी बोलेन. पण थांबणार नाही. मी थांबावं असं वाटतं तर या कागद घेऊन.

गिरीश महाजन: ऐका तुम्ही, असं करू नका. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकारला थोडा वेळ द्या. आपण आरक्षणाचा आणि इतर दोनचार प्रश्न मार्गी लावू. फक्त तुमचा निर्णय तुम्ही थोडा लांबवा. मी मुख्यमंत्री यांच्याशी तुमचे बोलणे करून देतो. ही काम तुमच्या हातूनच होणार आहे. कुठेही याला आव्हान देता येणार नाही असे आरक्षण देयचे आहे. 

Web Title: Troubleshooter Girish Mahajan's phone call before the fast; Manoj Jarange replied by asking for the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.