चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:03 AM2018-01-30T00:03:32+5:302018-01-30T00:03:34+5:30

वडीगोद्री : चालकास मारहाण करत हातपाय बांधून ऊसाच्या शेतात फेकून देत १९ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक पळवून नेल्याची ...

Truck hijacked, robbery at Vadigodri | चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला

चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला

googlenewsNext

वडीगोद्री : चालकास मारहाण करत हातपाय बांधून ऊसाच्या शेतात फेकून देत १९ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक पळवून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारात घडली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव साहेबराव पाळवदे (३९, रा.सासोरा,ता.केज,जि.बीड) असे हायवा चालक व मालकाचे नाव आहे. पाळवदे यांचा हावया ट्रक (एमएच.४८,टी ६३६९) आयआरबी कंपनीचे गुत्तेदार गुरुदत्त अडसूळ यांच्या वडीगोद्री परिसरातील साईटवर सुरू होता. दिवसभर काम केल्यानंतर रविवारी रात्री त्यांनी वडीगोद्री येथील वैष्णवी ढाब्यासमोर हायवा उभा केला आणि केबिनमध्येच झोपले. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास एका संशयितांने ट्रकच्या केबिनचा दरवाजा वाजला. जाग आल्यामुळे पाळवदे यांनी काच खाली करून विचारले असता, बाहेर उभ्या व्यक्तीने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी देण्यासाठी केबिनचा दरवाजा उघडताच खाली उभा असलेली व्यक्ती केबिनमध्ये चढली. दुसºया बाजूने आणखी दोघेजण आत आले. त्यांनी उद्धव पाळवदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवे मारण्याच्या धमक्या देत खाली दाबून ठेवले. स्टेअरिंंगला अडकविलेल्या चाबीने ट्रक सुरू करून ते भरधाव बीडच्या दिशेने निघाले. ट्रकचे लाईट लागत नसल्याने त्यांनी मारहाण करून लाईट सुरू करण्यास सांगितले. अर्धा तास गाडी चालविल्यानंतर अंधारात गाडी थांबवून पाळवदे यांना खाली उतरवले. जिवे मारण्याची धमकी देत हातपाय बांधून रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शेतात नेऊन टाकले. घाबरलेल्या पाळवदे यांनी तासाभरात स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत, पहाटे साडेतीनच्या सुमारास बाजूची वस्ती गाठली. वस्तीवरील काही नागरिकांना घडला प्रकार सांगितला. स्थानिकांनी हा झिरपीतांडा असल्याचे सांगून पाळवदे यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी पत्नीशी संपर्क करून घडला प्रकार सांगितला.
या प्रकरणी उद्धव पाळवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयितांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करीत आहेत.
------------
आठवडाभरापूर्वीच खरेदी
उद्धव पाळवदे यांनी २३ जानेवारीला बोरवली येथील तेजपाल जोशी यांच्याकडून १८ लाख ६७ लाखाला हायवा ट्रक खरेदी केला होता. १४ लाख ६७ हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देण्याचा करार केला होता. घरी ट्रकची पूजा केल्यानंतर त्यांनी २४ जानेवारीला काम सुरू केले होते. चार दिवसांनंतर हा ट्रक संशयितांनी पळवून नेला.

Web Title: Truck hijacked, robbery at Vadigodri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.