स्ट्राँग रूममधील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:15 AM2019-07-16T01:15:20+5:302019-07-16T01:15:40+5:30
जुना जालना भागातील गांधी चमन परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या स्ट्राँग रूमपर्यंत जाऊन तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील गांधी चमन परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या स्ट्राँग रूमपर्यंत जाऊन तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जुना जालना भागात भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) शाखा आहे. शाखेचे लेखापाल मोहित अश्विनकुमार व त्यांचे सहकारी १२ जून रोजी रात्री ७.३० वाजता कामकाज संपल्यानंतर घरी गेले होते. त्यानंतर सलग दोन दिवस बँकेला सुट्या होत्या. सोमवारी सकाळी बँकेचे मॅनेजर संदीप राजदेव, सुरक्षा रक्षक भांबरे हे बँकेत आले असता चॅनल गेटचे व बँकेच्या शटरचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळी आलेले लेखापाल व इतरांनी बँकेत जाऊन पाहणी केली असता चोरट्याने आतील स्ट्राँग रूमपर्यंत जाऊन तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
बँकेच्या शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केलेल्या चोरट्याच्या हलचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. पोलिसांनी चोरट्याच्या हालचालींची पाहणी केली असून, त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.