दिव्यांगत्वावर मात करीत त्याने सुरु केला मोबाईलचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:40 AM2019-05-19T00:40:19+5:302019-05-19T00:40:58+5:30
शंकरनगरमध्ये राहणाऱ्या बळीराम रामभाऊ तिडके या तरुणाने दिव्यांगत्वावर मात करत स्वत : भांडवल उभारुन व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याला आई-वडिलांचा पाठिंबा लाभला.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील शंकरनगरमध्ये राहणाऱ्या बळीराम रामभाऊ तिडके या तरुणाने दिव्यांगत्वावर मात करत स्वत : भांडवल उभारुन व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याला आई-वडिलांचा पाठिंबा लाभला.
बळीराम तीन महिन्यांचा असताना त्याला तापातच पोलिओ डोस देण्यात आला. यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. वडिलांना अंधत्व असल्यामुळे आईनेच तिन्ही भावांचा सांभाळ केला. बळीरामने आठवी पर्यंतचे शिक्षण शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील अपंग शाळेत घेतले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण जनता हायस्कूलमध्ये झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बळीराम शिक्षण घेत असताना सेतू कार्यालयात उत्पन्न व रहिवासी दाखल्याचे फार्म नागरिकांना भरुन देत असे. त्यातून मिळणारे अर्धे पैसे तो घरी देत होता. तर अर्धे पैसे स्वत: जवळ ठेवत होता. लहानपणापासूनच बळीरामला व्यवसाय करण्याची आवड होती.
या पैशातून त्याने पान टपरी टाकली. या व्यवसायातून त्याने भांडवल उभारले. पान टपरीचा व्यवसाय चालत नसल्याने तो शहरातील मोबाईल शॉपवर काम करत होता. वडिलांच्या अंधत्वामुळे बळीरामवरच घरातील व्यक्तींची जबाबदारी होती. त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळून त्याला व्यवसायासाठी भांडवलही उभारायचे होते. त्यामुळे तो जास्त वेळ कामही करत होता.
भांडवल जमा होताच बळीरामने स्वत:चा व्यवसाय सुरु केला असून, त्याला शासनाने कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही.
सध्या त्याने मोबाईल शॉपचे दुकान टाकले आहे. बळीरामाचे वडीलही दृष्टिहीन असतानाही काम करत असतात. त्याला ही उर्जा त्याच्या वडिलांपासून मिळाली आहे.
त्यामुळे अहोरात्र परिश्रम घेत असून, त्याला आपल्या व्यवसायात वाढ करायची आहे. बळीराम दिव्यांगत्वावर मात करत मोठ्या जिद्दीने आपल्या व्यवसायात काम करत आहे. व्यवसायात वाढ करण्याची त्याची इच्छा आहे.