बाराशे भावी पोलिसांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:15 AM2018-04-07T00:15:26+5:302018-04-07T00:15:26+5:30
पोलीस मुख्यालयाच्या ५० जागांसाठी शुक्रवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२५७ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील पोलीस मुख्यालयाच्या ५० जागांसाठी शुक्रवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२५७ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमच व्हिडिओ चित्रीकरणासह ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला.
पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या १३१२ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आॅनलाइन प्रवेशपत्र पाठविण्यात आले होते. पैकी १२५७ उमेदवार सकाळी प्रत्यक्ष मैदानावर हजर राहिले. उमेदवारांना बायोमेट्रिक हजेरी घेऊन परीक्षेच्या ठिकाणी सोडण्यात आले. या ठिकाणी उमेदवारांसाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी लेखी परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर स्वत: मैदानावर हजर होते. शिवाय ७० अधिका-यांसह ३०० कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडिओ चित्रकरण करण्यात आले. वरिष्ठ अधिका-यांना लेखी परीक्षा सुरू संपूर्ण मैदानावर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता यावे यासाठी प्रथमच ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार न घडता परीक्षा शांततेत पार पडली.