घनसावंगी तालुक्यात तीन दिवसांपासून बावीस गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 07:21 PM2020-10-14T19:21:50+5:302020-10-14T19:22:50+5:30
Jalana News तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नसल्याने सर्व गावातील व्यवहार ठप्प
रांजणी : रविवारी सकाळी पोलवर वीज पडल्याने घनसावंगी तालुक्यातील रांजणीसह २२ गावे मागील तीन दिवसांपासून अंधारात आहेत. तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नसल्याने सर्व गावातील व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
रांजणी व परिसरात रविवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर-रांजणी वीज वाहिनीवरील पोलवर वीज पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दुपारी पाऊस कमी झाल्याने महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरूस्ती करण्यास सुरूवात केली. परंतु, सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने रविवारी वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु, तीन तासातच पुन्हा बिघाड झाली. अनेकवेळा कर्मचाऱ्यांनी दुरूस्ती केली. मात्र, काहीच फायदा झाला नाही.
मागील तीन दिवसांपासून रांजणी केंद्रासह बोररांजणी, करडगाव, चित्रवडगाव, माहेरजवळा, कंदारी या उपकेंद्राअंतर्गत येणारी २० ते २२ गावे अंधारात आहेत. विद्युत पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेचे व्यवहार बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राजंणी केंद्राचे सहायक अभियंता ए. एम. म्हस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ ए. एम. जईद, एच. टी. टेंबरे, एल. डी. पठाडे, एस. बी. पाटोळे, व्ही. आर. शिंदे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी
विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. तसेच अनेक गावांचा पाणीपुरवठा देखील बंद आहे. भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने मोबाईल बंद पडले आहेत. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहात आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी दीपक उघडे, लक्ष्मण पाटोळे, अंबादास मोरे आदींनी केली आहे.