पोलिसाला दगड मारणाऱ्या दोन आरोपींना एक वर्षाची शिक्षा
By दिपक ढोले | Published: June 26, 2023 07:48 PM2023-06-26T19:48:32+5:302023-06-26T19:49:32+5:30
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले.
जालना : पोलिसाला दगड मारून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी सटवाजी भागडे (रा. भागडे सावरगाव, ह.मु.सेवली, जि. जालना) व लहू पंडित जाधव (रा. वखारी पत्रातांडा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
३ मार्च २०१६ रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी वाहनाने दोन्ही आरोपींना पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पुढील तारीख दिली होती. पोलिस आरोपींना घेऊन वाहनाकडे जात असताना, दोन्ही आरोपी पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
यावेळी लहू जाधव याने एका पोलिसाला दगड मारला. तर दुसरा आरोपी शिवाजी भागडे हा गाडी घेऊन पळवून गेला. या प्रकरणी डिंगाबर शामराव राठोड यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल डिगांबर राठोड, बहुरे, डॉ. भिवटे, पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक डी. पी. सानप यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. न्यायालयाने साक्षीपुराव्याच्या आधारावरून आरोपी शिवाजी भागडे, लहू जाधव या दोघांना एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. बी. के. खांडेकर यांनी काम पाहिले.