टेंभुर्णीतील दोन अंगणवाड्या घाणीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:30 AM2021-07-31T04:30:02+5:302021-07-31T04:30:02+5:30
टेंभुर्णी : एकात्मिक बालविकास सेवा योजनातर्फे सुरू असलेल्या टेंभुर्णी येथील दोन अंगणवाड्यांना चोहोबाजूंनी घाणीचा विळखा पडला आहे. अक्षरशः अंगणवाड्यांच्या ...
टेंभुर्णी : एकात्मिक बालविकास सेवा योजनातर्फे सुरू असलेल्या टेंभुर्णी येथील दोन अंगणवाड्यांना चोहोबाजूंनी घाणीचा विळखा पडला आहे. अक्षरशः अंगणवाड्यांच्या दरवाजांंसमोर विष्ठा टाकली जात असल्याने दोन्ही अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. या अस्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
येथील कचेरीच्या जुन्या इमारतीजवळ अंगणवाडी क्र. १ माळी गल्ली व अंगणवाडी क्र. २ धनगरगल्ली अशा दोन अंगणवाड्या चालविल्या जातात. या दोन्ही अंगणवाड्यांतून बालकांसह गरोदर व स्तनदा माता यांना नियमित पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. मात्र मागील अनेक वर्षांपासून या अंगणवाड्यांंना सर्व बाजूंंनी घाणीने वेढले आहे. यामुळे अंगणवाडीत जावे तरी कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. काही जण तर मुद्दामहून अंगणवाड्यांच्या प्रवेशद्वारातच प्रात:विधीला बसत असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय या इमारतीला लागूनच कचेरीची निजामकालीन मोडकळीस आलेली इमारत असल्याने ती पडण्याचाही धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही अंगणवाड्यांचे मिळून जवळपास २०७ लाभार्थी आहेत. या घाणीमुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह या सर्व लाभार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकात्मिक बालविकास कार्यालय व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबींकडे त्वरित लक्ष देऊन या अंगणवाड्यांचे नवीन जागेत स्थलांतर करावे, अशी मागणी होत आहे.
कोट
अंगणवाडी परिसरातील अस्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाला अवगत केले आहे. मात्र काहीच उपयोग होत नाही. अनेकदा तर दारातच मानवी विष्ठा पडलेली असते. यामुळे आम्हा कर्मचाऱ्यांसह माता व बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
- छाया साबळे व मालती गायकवाड
अंगणवाडी सेविका, टेंभुर्णी
फोटो