जालन्यात आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:41 AM2019-01-02T11:41:19+5:302019-01-02T11:54:03+5:30
बदनापूर येथील गुरुकृपा फोटो स्टुडिओमध्ये चालायचे रॅकेट.
जालना : कोणत्याही तांत्रिक अभ्यासक्रमाचे (ट्रेड) शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण न घेता थेट राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण परिषदेचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विकण्याऱ्या दोघांना पोलिसांनी बदनापूर येथील एका फोटो स्टुडिओमधून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री केली. फोटो स्टुडिओ चालक भगवान साहेबराव खांडेभराड व संतोष ज्ञानदेव मनभरे (रा. धोपटेश्वर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बदनापूर येथे गुरुकृपा फोटो स्टुडिओ आहे. या फोटो स्टुडिओमध्ये बदनापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन त्याची विक्री होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून प्रमाणपत्र तयार करुन घेतले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातील काही बनावट प्रमाणपत्रासह संगणक, प्रिंटर्स, स्कँनर्स पोलिसांनी जप्त केली असून, संगणकातून अनेकांना प्रमाणपत्र दिल्याचे समजते. आरोपीविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, पोहवा. संतोष सावंत, पोना. फुलसिंग घुसिंगे, फुलचंद हजारे, समाधान तेलंग्रे, सदाशिव राठोड, रवी जाधव यांनी केली आहे.
अनेकांना केले प्रमाणपत्रांचे वाटप
या दोघांनी अनेक जणांना महाराट्र राज्य तंत्र शिक्षण परिषदेची प्रमाणपत्रे बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण आहेत ? याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे.
२ हजार रुपयांना प्रमाणपत्राची विक्री
कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयटीआयचे प्रमाणपत्र लागते. त्यामुळे अनेकजण या दोघांकडे प्रमाणपत्रासाठी येत होते. ते एक प्रमाणपत्र २ ते ३ हजार रुपयांना देत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.