जालन्यात पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 04:28 PM2019-04-13T16:28:37+5:302019-04-13T16:30:09+5:30
जालना गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या झडतीत शहरातील दोघाजणांकडे अमेरिकन बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस सापडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने गुन्हेगारी कारवाया मोडून काढण्यासाठी सध्या झाडाझडतीची मोहीम सुरु आहे. जालना शहरातील रामनगर कॉलनीतील निलेश भिकाजी भिंगारे यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती होती. त्याआधारे शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक भिंगारेच्या घराची झडती घेतली.
यावेळी भिंगारे याने आपल्याकडे पिस्तूल असल्याची कबुली दिली, मात्र ते त्याच्या मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार त्याचा मित्र शेख हकीम उर्फ पप्पू शेख रहीम याच्या मंठा चौफुली परिसरातील घराची पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्या हा अमेरिकन बनावटीचा एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुसे सापडली आहेत. निलेश भिंगारे आणि शेख हकीम (पप्पू) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे.