जालन्यात दोन बांगलादेशी पकडले; बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:12 IST2025-04-09T18:12:05+5:302025-04-09T18:12:40+5:30
अधिक चौकशी केली असता त्यांनी बांगलादेशातून भारतात विनापरवाना प्रवेश केला असल्याचे आढळून आले.

जालन्यात दोन बांगलादेशी पकडले; बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
बदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील वरुडी शिवारातील नूर हॉस्पिटलजवळील रोडवर सोमवारी (दि. ७) एक महिला व एक पुरुष असे दोघे बांगलादेशी आढळून आले असून, त्यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी बदनापूर येथील पोलिस कॉन्स्टेबल रियाज महंमद पठाण यांनी फिर्याद दिली आहे. ७ एप्रिल रोजी डायल ११२ वर आलेल्या कॉलनुसार त्यांनी नूर हॉस्पिटलजवळ पाहणी केली. त्यावेळी तेथे एक स्त्री व एक पुरुष भांडण करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी भांडण सोडून दोघांना पोलिस स्टेशनमध्ये आणून विचारपूस केली असता त्यांनी दोघे पती-पत्नी असून, मुंबई येथे राहत असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी बांगलादेशातून भारतात विनापरवाना प्रवेश केला असल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी असलम मनी काजी (२६, रा. रुद्रपूर, पोस्ट गोगा काईबा ठाणा सरसा, जिल्हा जसोर खुलना, स्टेट बांगलादेश) व बुलबुली मुस्ताफजूर रहमान (२३, रा. रॉंगपूर विभाग ठाणा किशोर गंज जिल्हा निलफामरी, बांगलादेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजय जयस्वाल करीत आहेत.