दोन दुचाकींची समोरासमोर धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
By दिपक ढोले | Published: April 5, 2023 07:14 PM2023-04-05T19:14:57+5:302023-04-05T19:15:27+5:30
टेंभुर्णी गावाजवळ आल्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.
टेंभुर्णी : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी ठार झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना टेंभुर्णी - जाफराबाद रोडवरील टेंभुर्णी गावाजवळ बुधवारी सायंकाळी घडली.
पोलिस कर्मचारी नितीन उत्तम मतकर (वय ३२ वर्षे, रा. जवळखेडा, ता. देऊळगावराजा) व राहुल रामू जंगले (वय ३५ वर्षे, रा. टेंभुर्णी) हे दोघे टेंभुर्णी येथून जाफराबादकडे दुचाकीने जात होते. हर्षल मुख्यदल व गणेश बाळू पवार (रा. जुमडा, ता. देऊळगाव राजा) हे जाफराबाद येथून टेंभुर्णीकडे भरधाव वेगाने येत होते. टेंभुर्णी गावाजवळ आल्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात डोक्याला गंभीर मार लागल्याने नितीन मतकर हे जागीच ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी असल्याने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे.
यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. मयत नितीन मतकर हे मौजपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असून, टेंभुर्णी येथील राहुल जंगले यांच्या भेटीसाठी ते टेंभुर्णीला आले होते. दोघे मित्र जाफराबादकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. घटनेचा अधिक तपास प्रभारी एपीआय बालाजी वैद्य व बीट जमादार पंडित गवळी करीत आहेत.