गुप्तधन शोधणारे दोघे भाऊ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:51 AM2018-08-06T00:51:34+5:302018-08-06T00:51:56+5:30
जुना जालना भागातील कपूर गल्लीतील एका घरात गुप्तधन असल्याच्या संशयावरून कदीम जालना पोलीसांनी शनिवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून दोन सख्या भावांना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील कपूर गल्लीतील एका घरात गुप्तधन असल्याच्या संशयावरून कदीम जालना पोलीसांनी शनिवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून दोन सख्या भावांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पूजेसाठीचे साहित्य, एक लोखंडी सब्बल, फावडे जप्त करण्यात आले.
कदीम जालना पोलिसांना या परिसरात गुप्तधन काढण्यासाठी शिवाजी देवराव अवघड आणि ज्ञानेश्वर देवराव अवघड या दोन्ही भावांनी विशेष पूजेचे आयोजन केल्याची माहिती मिळाली. लगेचच पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गर्शनाखाली पोलिसांचा ताफा रात्री घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी एका बंद खोलीत हे दोघे भाऊ लोखंडी सब्बलने खड्डे खोदताना दिसून आले. प्रारंंभी पोलिसांनी दरवाजाच्या फटीतून कानोसा घेतला. आणि नंतर त्यांना दरवाजा उघडण्याचे आदेश देऊन आम्ही पोलीस असल्याचे सांगितल्यावर अवघड बंधूंनी दरवाजा उघडला. यावेळी त्या खोलीत चार फूट खोल खड्डे खोदले आढळून येऊन काळी बाहुली, कवड्या आढळून आल्या.
अवघड बंधूंनी हे गु्प्तधन कोणाच्या सांगण्यावरून काढण्याचा प्रयत्न केला त्या मांत्रिकाचा शोध पोलीस घेत असून, पथक रवाना झाले आहे.
त्या पोलीसांनी जप्त केल्या असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरूध्द कदीम जालना पोलीसांनी जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागातील गुप्तधन काढण्यासाठी त्यांनी यापूर्वी एका मांत्रिकाची मदत घेतली होती, तो मांत्रिक नेमका कोण होता, याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बोर्डे यांनी दिली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उप निरीक्षक शैलेश शेजूळ आदींची उपस्थिती होती.