छत्रपती संभाजीनगरमधून येऊन जालन्यात चेन स्नॅचिंग करणारे दोघे जेरबंद
By विजय मुंडे | Published: April 5, 2024 04:19 PM2024-04-05T16:19:50+5:302024-04-05T16:21:41+5:30
बडी सडक भागातील चैन स्नॅचिंग प्रकरणातील चोरीचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
जालना : शहरातील बडीसडक भागात चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.अनिकेत रावसाहेब हिवाळे (वय-२३ रा. विश्रांतीनगर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याजवळ छत्रपती संभाजीनगर), शुभम मधुकर आधुडे (वय-२२ रा. रामनगर छत्रपतीसंभाजीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
बडी सडक भागातील चैन स्नॅचिंग प्रकरणातील चोरीचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या घटनेची चौकशी करीत असताना अनिकेत हिवाळे याने ती चोरी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरूवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे जावून अनिकेत हिवाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात केला. अनिकेत याने ती चोरी शुभम आधुडे याच्यासमवेत केल्याचे सांगितले. त्यानुसार आधुडेचा शोध घेतला असता तो घनसावंगी येथे जात असल्याचे समजले. त्याचा पाठलाग करून वाकुळणी (ता.बदनापूर) येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीतील गंठण जप्त करण्यात आले. या कारवाईत दुचाकी, एक मोबाईल, सोन्याचे गंठण असा एकूण ३ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. शांतीलाल चव्हाण, पोउपनि. राजेंद्र वाघ, अंमलदार कृष्णा तंगे, रमेश राठोड, विजय डिक्कर, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सतिश श्रीवास, योगेश सहाने यांच्या पथकाने केली.