भरधाव कंटेनरने चिरडल्याने दोन चिमुकल्या बहिणींचा जागीच अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 05:52 PM2020-12-09T17:52:32+5:302020-12-09T17:56:16+5:30
अपघातानंतर कंंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
जालना : भरधाव कंटेनरने चिरडल्याने घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. ही दुदैर्वी घटना बुधवारी दुपारी जालना- सिंदखेडराजा मार्गावरील नाव्हा शिवारात घडली.
सुमय्या शेख सलीम (८) व शाईन शेख सलीम (७ रा. धारकल्याण ता. जालना) अशी मयत मुलींची नावे आहेत. धारकल्याण येथील सुमय्या शेख व शाईन शेख या दोन बहिणी काही दिवसांपूर्वी आजीकडे नाव्हा या गावी गेल्या होत्या. त्या दोघी बुधवारी दुपारी नाव्हा येथील घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरच्या (क्र. एन. एल. ०२- के. ८४६२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर त्या मुलींच्या अंगावर गेला. कंटेनरने चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर मयत मुलींच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी पार्थिव जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.