हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू; परतूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 07:06 PM2023-07-09T19:06:06+5:302023-07-09T19:06:19+5:30
पोहता येत असतानाही पाण्याचा अंदाज न आल्याने, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
दिपक ढोला
परतूर (जालना) : पोहता येत असतानाही पाण्याचा अंदाज न आल्याने, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना परतूर तालुक्यातील केदारवाकडी येथील निम्न दुधना धरणात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित दीपक टाक (२३), नितीन गुणाजी साळवे (२५ दोघे रा.सेलू , जि.परभणी) अशी मयतांची नावे आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रोहित टाक व नितीन साळवे हे दोघे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निम्न दुधना प्रकल्पावर केदारवाकडीच्या भिंतीजवळ पाेहण्यासाठी गेले होते. कपडे, मोबाइल एका ठिकाणी ठेवून ते धरणात पोहण्यासाठी उतरले. दोघांनाही पोहता येत होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्याच वेळी मच्छीमारांनी उड्या मारल्या. याची माहिती परतूर पोलिसांना देण्यात आली. परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मच्छीमार व पोलिसांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर, तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती मयतांच्या नातेवाइकांना देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल आडे, सतीश जाधव, शिवराज लुचारे, नीलेश भणगे, भरत कुटारे, पांडुरंग कुटारे, सुरेश धिसडे, बाळू घिसडे, महादेव बिजुले, परमेश्वर बिजुले यांनी मृतदेह बाहेर काढले.