कंत्राट घेण्यावरून दोन गट भिडले; हाणामारी सोडविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 04:05 PM2022-07-23T16:05:07+5:302022-07-23T16:05:23+5:30
जालना शहरातील नागेवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका कंपनीच्या लेबरचे कंत्राट घेण्यावरून दोन गटांत हाणामारी सुरू होती.
जालना : एका कंपनीचे कंत्राट घेण्यावरून सुरू असलेली हाणामारी सोडविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने हवेत गोळीबार केल्याची घटना जालना शहरातील नागेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या हाणामारीत तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जालना शहरातील नागेवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका कंपनीच्या लेबरचे कंत्राट घेण्यावरून दोन गटांत हाणामारी सुरू होती. तेवढ्यात सपोनि. साईनाथ रामोड हे बदनापूरकडे जात होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव शांत होत नसल्याने त्यांनी हवेत एक राउंड फायर केला. त्यामुळे जमाव पांगला. हाणामारीत ज्ञानेश्वर तुकाराम वाघुडे, गणेश तुकाराम वाघुडे व कृष्णा रूस्तुम वाळके (सर्व रा. नागेवाडी, जालना) हे जखमी झाले होते. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी दिली.
सात संशयित ताब्यात : एसपींची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी नीरज राजगुरू, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि. रघुनाथ नाचण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.