समृध्दी महामार्गासाठी दोन इंटरचेंजचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:40 AM2018-08-13T00:40:40+5:302018-08-13T00:41:31+5:30
मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय जवळपास झाला असून, येत्या पंधरा दिवसात या संबंधिची अधिसूचना निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई ते नागपूर या महामार्गासाठी जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यासाठी जवळपास ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. या संपादनामुळे या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित झाल्या आहेत, अशा शेतक-यांना अंदाजे ५०० कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा मावेजा मिळाला असून, आता केवळ आंबेडकरवाडी परिसरातील मोजणी तसेच त्या शेतक-यांची रजिस्ट्री राहिली आहे.
ही रजिस्ट्री करताना आता नवीन भूसंपादनाच्या कायद्यानुसार करण्यात येणार आहे. यात पूर्वी ज्या शेतक-यांनी त्यांच्या जमिनी या महामर्गासाठी संपादित करण्यासाठी अटकाव केला होता, त्यांच्या शेतजमिनी सरकार आता सक्तीने संपादित करणार आहे. तसेच पूर्वी पाच पट भाव दिला जात होता, तो आता या नवीन भूसंपादन आदेशामुळे चार पटच देण्यात येणार आहे.
या संदर्भातील अध्यादेश रस्ते विकास महामंडळाने प्रसिध्द केला आहे.
जालन्यात जुन्या जागेवर इंटरचेंज पॉइंट व्हावा म्हणून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून नारायण गजर व समितीच्या अन्य पदाधिका-यांनी यासाठी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच हे शक्य झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना : दोन इंटरचेंज मुळे होणार वाहतूक सुकर
जालना येथे पूर्वी ज्या भागातूना इंटरचेंज पॉईट जाणार होता, तो कायम ठेवण्यात आला आहे. तसेच भविष्यात ड्रायपोर्टची उभारणी झाल्यावर तेथे जड वाहनांना थेट प्रवेश मिळावा म्हणावा म्हणून स्वतंत्र इंटरचेंज हा निधोना,शेलगाव दरम्यान करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या इंटरचेंज परिसरा सोबतच नवीन इंटरचेंज पॉइंट करण्या मागे पुढील ५० वर्षाचा वाहतूकीचा अभ्यास करण्यात आला आहे. जुन्या इंटरचेंज पॉइंटवरून ही जड वाहतूक करणे म्हणजे आज मोतीबाग जवळून जाणा-या बायपास अर्थात वळण रस्त्याची जी अवस्था झाली आहे, तशी होऊ शकते. त्यामुळे जड वाहनांचा त्रास भविष्यात येथे होऊ नये म्हणून हा दुसरा इंटरचेंज पॉइंट निर्माण करण्यात येणार आहे.