दोन महिन्यानंतर ‘त्या’ मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा; दोघे कर्नाटकातून ताब्यात, मुख्य आरोपी फरार
By दिपक ढोले | Published: October 28, 2022 10:23 AM2022-10-28T10:23:06+5:302022-10-28T10:24:38+5:30
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात जालना पोलिसांना यश आले आहे.
जालना: घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात जालना पोलिसांना यश आले असून, दोन आरोपींना कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य आरोपी फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
२२ ऑगस्टला समर्थ रामदास स्वामींच्या देव्हाऱ्यातील प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह अन्य पंचधातूच्या मूर्तींची चोरी झाली होती. त्या घटनेला दोन महिने उलटल्यावर पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नव्हते. यासाठी पोलीस यंत्रणेकडून सर्व बाजूंनी तपासाची सूत्र फिरविण्यात आली. असे असताना कुठलाच सुगावा पोलिसांना लागला नव्हता. यामुळे संपूर्ण रामभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आणि रोषही होता. यासाठी सर्व साधु- संतांनी जांब समर्थ येथे एकत्रित येत मोठे आंदोलन केले होते; परंतु, त्यानंतरही मूर्तीचा तपास लागला नव्हता. यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. दिवाळीच्या काळात पोलिसांनी चौकशी करून कर्नाटकातून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार असून, मूर्ती अद्यापही मिळाल्या नाहीत, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"