‘नायजेरीनयन फ्रॉड’ करणारे दोघे गजाआड, ओएलएक्सवर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:55 PM2018-02-08T19:55:22+5:302018-02-08T19:55:36+5:30
ओ.एल.एक्स. या संकेत स्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाइन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा प्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.
जालना : ओ.एल.एक्स. या संकेत स्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाइन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा प्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.
मुरसलीम फजरू खान (२३,रा.घोघोर, भरतपूर, राजस्थान) व सद्दाम खान कासू खान (२३,झेंजपुरी, भरतपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जालना पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी अभिषेक शिरगुळे याने ओ.एल.एक्स या संकेतस्थळावर आयफोन खरेदी केला होता. मोबाईल विक्री करणा-यास त्यांनी पेटीएमद्वारे साडेबारा हजार रुपये दिले होते. विक्री करणा-याने शिरगुळे यांच्याशी ओळख करून त्यांचे शासकीय ओळखपत्र व आधारकार्ड व्हॉटअॅपवर मागवून घेतले. पैसे देवूनही मोबाईल मिळत नसल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीस संपर्क केला असता, त्याने मोबाईल पाठविल्याचे सांगितले. शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्या आधारे ओएलएक्सवर बनावट जाहिरात दिली. त्यामुळे शिरगुळे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वस्तू मिळाली नसल्याबाबत फोन आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार सायबर सेल तथा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना सांगितला. तसेच सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासात संशयितांची सर्व माहिती मिळविल्यानंतर शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्याआधारे इतरांची फसवणूक झाल्याचे समोर आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मूळ गावी सायबर सेलचे पथक पाठविण्यात आले. मात्र, संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर पथकाने झेंजपुरी येथे काही दिवस थांबवून खब-यांमार्फत संशयितांची माहिती मिळवली. पाच फेबु्रवारीला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून जालन्यात आणले. चौकशीत त्यांनी अशाच पद्धतीने इतर राज्यातही अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, दहा सीमकार्ड जप्त केले आहेत.न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सायबर सेलेचे प्रभारी अधिकारी बी.डी. बोरसे, हेड काँस्टेबल भालचंद्र गिरी, लक्ष्मिकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीश गोफणे, शिवप्रसाद एखंडे, शेख इरफान शेख, योगशे सहाणे, संगीता चव्हाण, अर्चना आधे यांनी ही कारवाई केली.
नायजेरियन अधिक सक्रीय
पोलीस रेकार्डनुसार अशा पद्धतीने आॅनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार नायजेरियासह इराणी हकर्सकडून मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची फसवणूक नायजेरियन फ्रॉड म्हटले जाते, असे पोलीस निरीक्षक गौर यांनी सांगितले.