व्यापा-याला लुटणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:14 PM2017-11-24T23:14:06+5:302017-11-24T23:14:41+5:30
व्यापारी मुकेशलाल काबरा यांना अडवून गळ्यातील एक लाखांची सोन्याची साखळी लुटून नेणाºया दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
जालना : येथील व्यापारी मुकेशलाल काबरा यांना अडवून गळ्यातील एक लाखांची सोन्याची साखळी लुटून नेणाºया दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कृष्णा भिकूलाल पवार व परमेश्वर भाऊराव अंभोरे (रा. ढवळेश्वर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे, असून ते पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. मुकेश काबरा हे १९ सप्टेंबर हे रात्री नऊच्या सुमारास स्कूटीवरून मोलकरणीस सोडण्यास जात असताना, दोघांनी दुचाकी आडवी लावून त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून जवळच्या पांजरपोळ जंगलात नेले. काबरा यांच्या गळ्यातील एक लाखांची सोन्याची चेन काढून घेतली. हा प्रकार कुणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
तपासादरम्यान, वरील दोघांनीच हा गुन्हा केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ढवळेश्वर परिसरातून गुरुवारी रात्री उचलले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच काबरा यांची चेन परभणी येथे एका दुकानात विक्री केल्याचे सांगितले. दोघेही चार वर्षे मोक्कांतर्गत न्यायालयीन कोठडीत होते. दीड वर्षांपासून ते जामिनावर बाहेर होते. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, भालचंद्र गिरी, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, हिरामण फलटणकर, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, विलास चेके, वसंता राठोड, महिला कर्मचारी शमशादबी पठाण, बनसोडे यांनी ही कारवाई केली.