शहागड येथे दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:22 PM2019-06-12T17:22:03+5:302019-06-12T17:25:16+5:30
खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या.
शहागड (जि. जालना) : अंबड तालुक्यातील गोरी- गंधारी हद्दीत गोदावरी नदीपात्रातील खोल खड्ड्यात आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. (पान ५ वर)(पान १ वरून) किशोरी संतोष कुटे (१०), नेहा संतोष कुटे (८) अशी या दोघींची नावे आहेत.
मंगल संतोष कुटे (३९, रा. सावळेश्वर ता. गेवराई) यांच्यासोबत मंगळवारी धुणे धुण्यासाठी या दोघी सावळेश्वर येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या होत्या. मात्र पाणी नसल्याने गोरी- गंधारी येथील खड्ड्यात त्या धुणे धूत होत्या. या वेळी किशोरी व नेहा आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरल्या. खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यानंतर त्यांची आई मंगल यांनी आरडाओरड केली. परंतु, नदी पात्रात कोणीच नव्हते. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना पाण्याबाहेर काढले. दोघींना शहागड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन एका मुलीला मयत घोषित केले. दुसऱ्या मुलीला गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन तिलाही मयत घोषित केले.
गावात शोककळा
या दोन्ही मुली शहागड येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होत्या. किशोरी ही तिसऱ्या वर्गात, तर नेहा पहिलीत शिक्षण घेत होती. या घटनेने सावळेश्वर गावात शोककळा पसरली आहे.