मुद्देमालासह दोन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:55 AM2018-06-10T00:55:10+5:302018-06-10T00:55:10+5:30
चोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह चोरलेली एक म्हैस जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह चोरलेली एक म्हैस जप्त केली आहे.
नवीन मोंढा परिसरातील रामदयाळ बियाणी यांच्या गोदामाचे शटर तोडून चोरट्यांनी एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. या प्रकरणी राकेश बियाणी यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मोंढा परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.
कन्हैय्यानगर परिसरातील संशयित राहुल सुदाम जाधव (२५) याने आपल्या साथीदारासह गोदामात चोरी केल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना खब-यांमार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष कृती दलाच्या पथकाने राहुल जाधव यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संशयित भोलू भीमराव निकाळजे यांच्यासह ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी भोलू निकाळजे यालाही ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेले दोन लाखांचे वाहन जप्त केले. चौकशीत भोलू निकाळजे याने काही साथीदारांसह जानेवारी महिन्यात लालबाग परिसरातून एक म्हैस चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या पठारदेऊळगाव शिवारातील शिवारातून चोरीस गेलेली म्हैस ताब्यात घेतली.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यामार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक जाधव, ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, कैलास शर्मा, किरण चव्हाण, नंदकिशोर कामे, गजू भोसले, आकाश कुरील यांनी ही कारवाई केली.