सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी दोन निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:01 AM2018-02-26T01:01:31+5:302018-02-26T01:02:16+5:30
शहरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शहरात भूमिगत गटार व्यवस्था उभारण्यात येणार आहे. अटल अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ६८.६९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून सर्वप्रथम सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असून, त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शहरात भूमिगत गटार व्यवस्था उभारण्यात येणार आहे. अटल अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ६८.६९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून सर्वप्रथम सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असून, त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.
शहरात भूमिगत गटार योजना नसल्याने सांडपाण्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या आहे. मलनिस्सारणाची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार नसल्याने अनेक भागात उघड्या गटारांमधून पाणी मुख्य रस्त्यावर येते. शिवाय अंतर्गत भागात नाल्या तुंबल्यामुळे स्थानिकांची गैरसोय होते. शहरात भूमिगत गटार व्यवस्था उभारण्याची जुनी मागणी लक्षात घेता, अटल अमृत अभियानांतर्गत या कामाला मंजुरी मिळाली. सांडपाणी प्रक्रिया व भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी नगरपालिकेने एकूण चारशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यासाठी मंजूर झालेल्या निधीतून पहिल्या टप्प्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे हे तांत्रिक काम असल्याने निविदा प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेच्या सभेत या कामाचे दरपत्रक मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. सभेने मंजुरी दिल्यानंतर या कामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता घेण्यात येणार आहे.
टप्प्याटप्प्याने भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण केले जाणार आहे.