दोन हजार कृषी पंप बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:37 AM2017-12-10T00:37:44+5:302017-12-10T00:37:48+5:30
रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजार कृषी पंप बंद पडले आहेत. ऐनवेळी केलेल्या कारवाईमुळे पिकांना पाणी देण्याचे काम ठप्प झाले असून शेतक-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शेतक-यांनी कृषीपंपाचे चालू थकीत वीलबिल भरावे, यासाठी नोव्हेबर महिन्यातच महावितरणने कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम होती घेतली होती. रबीच्या पेरणीची पूर्वतयारी सुरू असताना मोहीम हाती घेतल्याने शेतक-यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे महावितरणने थकीत रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. या कालावधीत काही शेतक-यांनी रक्कम जमा केली, तर काहींनी केलीच नाही. त्यामुळे मुदत संपूनही विजेचा भरणा न करणाºया शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने पुन्हा सुरू केली आहे.
शनिवारी परिसरातील तब्बल दोन हजार शेतक-यांच्या कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये रायगव्हाण, आष्टी, वहिगाव सातारा, सुरूमगाव, चांगतपुरी, लोणी, गोळेगाव आदी गावांचा समावेश आहे. मुबलक पाणी असताना केवळ वीज नसल्याने पिकाला कसे द्यायचे असे आव्हान निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.