वाळू तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:25 AM2020-03-15T00:25:41+5:302020-03-15T00:25:59+5:30
शहागड पासून तीन किलोमीटर अंतरावरील कुरण (ता.अंबड) शिवारात पोलिसांनी कारवाई करून वाळू तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : शहागड पासून तीन किलोमीटर अंतरावरील कुरण (ता.अंबड) शिवारात पोलिसांनी कारवाई करून वाळूतस्करी करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून, कारवाईत एकूण २० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधवाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती गोपनीय शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सपोनि मिलिंद खोपडे, गोपनीय शाखेचे पो.कॉ महेश तोटे, गणेश लक्कस, मदन गायकवाड, सुशील कारंडे, अविनाश पगारे आदींच्या पथकाने शनिवारी सकाळी नऊ वाजता कुरण नदीपात्रात कारवाई केली. त्यावेळी नदीपात्रात असंख्य ट्रॅक्टर अवैधवाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आले. पोलीस पथक आल्याची समजताच अनेक तस्करांनी मिळेल त्या रस्त्याने वाहनासह पळ काढला. पथकाने अवैधवाळू भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले. ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर पोलिस ठाणे हद्दीत लावण्यात आले आहेत. गोंदी पोलिसांनी एकूण २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील गिरीजा नदी पात्रातून वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरूध्द पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली असून, या कारवाईत दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. या प्रकरणात पोहेकॉ विष्णू बुनगे यांच्या तक्रारीवरून समाधान प्रल्हाद गाडे विरूध्द जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द यापुढेही धडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.