दुचाकीचा आरसा हा केवळ केस विंचरण्यापुरताच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:24 AM2020-12-26T04:24:20+5:302020-12-26T04:24:20+5:30
जालना : अनेक युवकांनी दुचाकीचे आरसे काढून टाकले आहेत. ज्या दुचाकीला आरसे आहेत त्यातील अनेकजण आरसे आपल्या चेहऱ्याकडे ...
जालना : अनेक युवकांनी दुचाकीचे आरसे काढून टाकले आहेत. ज्या दुचाकीला आरसे आहेत त्यातील अनेकजण आरसे आपल्या चेहऱ्याकडे वळवून ठेवतात. त्यामुळे हे आरसे केवळ चेहरा पाहण्यासाठी आणि केस विंचरण्याच्या कामासाठीच वापरले जात असल्याचे चित्र आहे.
एका घरातील साधारणत: दोन ते तीन व्यक्ती स्वतंत्र दुचाकी वापरतात. त्यात युवकांकडे असलेल्या बहुतांश दुचाकींचे आरसे गायब झालेले आहेत. नियम मोडून दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु, एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करताना किंवा वळण रस्त्यावर वळताना पाठीमागे दुर्लक्ष झाले तर अपघात होण्याची भीती असते. त्यावेळी दुचाकीला असलेले आरसे कामी येतात. परंतु, शहरातील मोजक्याच दुचाकींना आरसे दिसून येतात. त्यातही अनेकजण त्याचा वापर चेहरा पाहण्यासाठी आणि केस विंचरण्यासाठी करतात.
आरसा नाही म्हणून २०० रुपये दंड
दुचाकीचालकांसाठी वाहतुकीचे अनेक नियम आहेत. त्यात दुचाकीला आरसे नसतील तर त्यांच्यावर नियमानुसार २०० रुपयांचा दंड होऊ शकतो. परंतु, अशी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे चालक आरसे बसविण्याकडे दुर्लक्ष करतात.
दुचाकीचालकांना हे नियम बंधनकारक
दुचाकी चालिवताना चालकांनी हेल्मेट घालणे, वाहन परवाना जवळ ठेवणे, दुचाकीला आरसे असणे, इन्शुरन्स काढणे, एका दुचाकीवर दोघांनी प्रवास करणे आदी नियम बंधनकरक आहेत.
शहरातील मार्गावरून वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीचालकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. ही कारवाई करताना दुचाकींना आरसे बसविण्याबाबत सूचित केले जात आहे. यापुढे दुचाकींना आरसे नसतील तर संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- यशवंत जाधव, पोनि. वाहतूक शाखा