दोन दिवसाला एक दुचाकी लंपास.!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:38 AM2019-06-24T00:38:40+5:302019-06-24T00:39:05+5:30
घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. यातील केवळ १३ प्रकरणांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. सरासरी दोन दिवसाला एका दुचाकीची चोरी होत असून, दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा राहिले आहे.
जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह शासकीय कार्यालये, वर्दळीची ठिकाणेच नव्हे तर घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गाडी चोरून त्याचे स्पेअर पार्ट काढून ते विक्री करण्याची नवी पद्धत सुरु केल्यामुळे या चोरट्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. पोलिसांनी जुनी दुचाकी विक्री करणाऱ्यांना संबंधित वाहनाची कागदपत्रे असल्याशिवाय दुचाकी विक्री करु नये, अशा नोटिसा पाठविल्या आहे. तरीही कागदपत्रे नसलेल्या वाहनांची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याचे बोलले आहे. दुचाकी अल्प किमतीत मिळत असल्याने ग्राहकही चोरट्यांच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे पोलीस तपासात वेळोवेळी समोर आले आहे.
पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले :जालना शहरात शेकडो पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करतात. या पोलिसांना चकवा देऊन ठिकठिकाणी चोºया होत आहेत. त्यात घरासमोर, पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही वर्षापूर्वी पोलिसांनी पेट्रोल चोरांना जेरबंद केले होते. मात्र, सध्या पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले आहेत.
‘जीपीएस’ बसविण्याची गरज शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहन चोरी होत आहे. चोरी झालेल्या वाहनांचे लोकेशन तात्काळ मिळावे, यासाठी वाहनधारकांनी आपापल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चोरीच्या दुचाकीची जालन्यातच विक्री : उद्योगनगरी म्हणून जालना शहराची ओळख आहे. परंतु, सध्या याच उद्योगनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होत आहे. बुलडाणा, परभणी, हिंगोलीसह इतर जिल्ह्यामधून चोरलेल्या दुचाकींची जालना शहरात विक्री होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या भागात सर्वाधिक चो-या : शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, सिंधी बाजार, शनि मंदिर, शिवाजी पुतळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी लंपास करतात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीस गेल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ची गरज असून शहरातील रेल्वेस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. मात्र, रेल्वेस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. शिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीही ‘सीसीटीव्ही’चा अभाव दिसतो. चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी आणि चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसविणे गरजेचे आहे.
दुचाकीचे ‘पोस्ट मॉर्टेम’ : चोरटे दुचाकी चोरी करतात. त्यानंतर एखाद्या भंगार विक्रेत्याकडे ती दुचाकी नेली जाते. त्यानंतर त्या दुचाकीचा एक-एक पार्ट काढला जातो. एखाद्या कारखान्याला या दुचाकीच्या पार्टची विक्री केली जाते.