पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:47 AM2020-01-08T00:47:00+5:302020-01-08T00:47:22+5:30
कुंभेफळ येथे पाच युवक तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात तलावात उतरलेले दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरापासून जवळच असलेल्या कुंभेफळ येथे पाच युवक तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात तलावात उतरलेले दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. विकास नारायण राठोड ( १८, रा. चंदनझिरा ) व नवनाथ प्रभाकर जाधव (१८, कुंभेफळ) अशी बुडालेल्यांची नावे असल्याची माहिती श्रीकांत भुजबळ यांनी दिली. सायंकाळी अंधार पडल्यामुळे दोघांचाही तलावाच्या पाण्यात शोध घेण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
अंबड रोडवरील जुन्या सूतगिरणी परिसरात कुंभेफळ येथे गावाला लागूनच तलाव आहे. हा तलाव सध्या पाण्याने तुडुंब भरलेला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास विकास राठोड, नवनाथ जाधव, स्वप्नील ठानगे, ईश्वर रायमल आणि पवन संत्रे हे पाच तरुण कुंभेफळ शिवारात फिरण्यासाठी गेले होते.
तलाव परिसरात फिरून बोरे खाल्यानंतर यातील विकास व नवनाथ पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र, दोघांनाही पोहता येत नव्हते. अचानक खोल पाण्यात गेल्यामुळे दोघेही बुडायला लागले. सोबत असलेल्या इतर तिघांनी आरडाओरडा करत विकास व नवनाथ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेबाबत तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका ठाण्याचे सहायक निरीक्षक आर. पी. जोगदंड, कॉन्स्टेबल पवार हे घटनास्थळी पोहोचले. विकास व नवनाथचे नातेवाइकांना माहिती मिळाल्यावर ते देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण केले होते, मात्र, सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा आला. दोन्ही तरुणांचा बुधवारी सकाळी नावेच्या साहाय्याने शोध घेतला जाणार आहे.
अनेकांनी दिल्या भेटी
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जालन्याचे तहसीलदार भुजबळ, मंडळ अधिकारी हरी गिरी तसेच तलाठी गिरी यांनी भेट देऊन पाहणी केली.
कुंभेफळ येथील उपसरपंच बाळासाहेब शिरसाट यांनी अग्निशमन यंत्रणेसह तलाठ्यांना ही माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.