ट्रेलर-दुचाकी अपघातात दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 05:13 PM2021-01-29T17:13:48+5:302021-01-29T17:14:15+5:30
अपघातानंतर ट्रेलर रस्ता दुभाजकावर चढला
बदनापूर ( जालना ) : तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील दावलवाडी पाटीजवळ दुपारी अडीज वाजता ट्रेलरच्या धडकेने दुचाकीवरील दोन युवकाचा जागीच मृत्यू झाला. वैभव दत्ता चव्हाण (18 ) आणि आकाश सारंगधर जाधव (21 ) असे मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना-औरंगाबाद रोडवर दावलवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जालन्याहून औरंगाबादकडे एक ट्रेलर ( क्रमांक एम एच 21 बी एच - 3316 ) जात होता. याच दरम्यान वैभव चव्हाण आणि आक्श जाधव हे दोघे मोटरसायकलवर ( क्रमांक एम एच 21 बी सी 0560 ) जात होते. ट्रेलरसोबत त्यांची धडक झाली. भरधाव ट्रेलर खाली आल्याने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे होऊन मांस आणि रक्ताने रस्ता माखला होता. तर दुसरीकडे ट्रेलर रस्ता दुभाजकावर चढले.
अपघाताची माहिती मिळताच पो.नि. मारुती खडेकर, पोहेकॉ गजानन जारवाल, एस. एस. भगत, शिवाजी काळूसे, बुणगे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. दोन्ही युवकांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दावलवाडी पाटीजवळ मोठी वाहने नेहमीच जास्त वेगाने जातात त्यामुळे येथे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यावर प्रशासनाने उपयायोजना करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत जगताप यांनी केली.