लाच प्रकरणात टंकलेखक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:53 AM2019-08-03T00:53:33+5:302019-08-03T00:54:03+5:30
उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत भोकरदन येथील उपविभाग कार्यालयातील टंकलेखक कनिष्ठ सहायकास ५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत भोकरदन येथील उपविभाग कार्यालयातील टंकलेखक कनिष्ठ सहायकास ५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी भोकरदन येथे करण्यात आली.
अनिल प्रभाकरराव कुलकर्णी असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा परिषद उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत (ल.पा.) भोकरदन येथील उपविभाग कार्यालयात अनिल कुलकर्णी हे टंकलेखक कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांची वरूड (बु.) शिवारात शेती आहे. या जमिनीचा अकृषक परवाना काढण्यासाठी तक्रारदाराला भोकरदन येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद (ल.पा.) उपविभाग भोकरदन येथून नाहरकत प्रमाणपत्र हवे होते. या प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराने कुलकर्णी यांच्याकडे रितसर अर्ज केला होता.
मात्र, कुलकर्णी यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी भोकरदन येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. नाहरकत प्रमाणात्रासाठी एक हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोनि विनोद चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, ज्ञानेश्वर म्हस्के, महेंद्र सोनवणे, संदिप लव्हारे, रमेश चव्हाण, सचिन राऊत, खंदारे यांनी केली.