दारू पिऊन वाद घालणाऱ्या युवकाचा चुलता, चुलत भावांनी काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:00 PM2019-09-04T12:00:47+5:302019-09-04T12:23:10+5:30

पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने आईवरही गुन्हा

uncle, cousins killed young man due to his alcoholism and dispute over land | दारू पिऊन वाद घालणाऱ्या युवकाचा चुलता, चुलत भावांनी काढला काटा

दारू पिऊन वाद घालणाऱ्या युवकाचा चुलता, चुलत भावांनी काढला काटा

googlenewsNext
ठळक मुद्देजालना जिल्ह्यात खळबळचित्तोडा नदीपात्राच्या परिसरात मृतदेह पुरला.

जालना : सतत दारू पिऊन वाद घालत शेतीतील हिस्सा मागणाऱ्या गणेश कोंडीअप्पा अलंकार (३०) याचा  चुलता आणि त्याच्या मुलांनी बदनापूर तालुक्यातील मांडवा येथे  खून केल्याची घटना उघडकीस आली.  

याप्रकरणी पोलिसांनी मृताचा चुलता भागनअप्पा अलंकार, चुलत भाऊ सचिन अलंकार, बाळू अलंकार, एक नातेवाईक भट्टू झिपरे आणि आई राधाबाई अलंकार या पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यातील भागनअप्पा सटवाअप्पा अलंकार आणि सचिन सदाशिवअप्पा अलंकार यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दिली.  या दोघांना ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  मुलाचा मृत्यू झाल्यावरही पोलिसांना मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिल्याने  आईविरूध्दही खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

गणेश आठवड्यापासून बेपत्ता होता.  तो बेपत्ता असल्याची खोटी तक्रार नातेवाईकांनी बदनापूर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र,  संशय आल्याने पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता रक्तातील नातेवाईकांनीच गणेशचा खून करून मृतदेहाची  विल्हेवाट लावल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळताच एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. 

गणेश अंलकार हा कुठलाच कामधंदा करत नव्हता. दारु पिऊन सतत वाद घालून शेतीतील  हिस्सा पाहिजे, असे म्हणून नातेवाईकांना त्रास देत असे. २७ आॅगस्टच्या रात्रीही गणेश दारु पिऊन घरी आला व त्याने वाद घातला.  यामुळे दोन चुलत भाऊ आणि चुलता तसेच इतर नातेवाईकांनी त्यास लाथाबुक्यांनी जबर मारहाण करून त्याच्या डोक्यावर दगड मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत त्याला घरी ठेवण्यात आले.  सकाळी तो मयत झाल्याचे निदर्शनास आल्याने नातेवाईक गांगरून  गेले. चुलत्यासह अन्य नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह गावाजवळील रामभाऊ अंभोरे यांच्या शेताजवळ पुरला.  हा मृतदेह पुन्हा बाहेर काढून सिंधी पिंपळगाव परिसरातील चित्तोडा नदीपात्राच्या परिसरात पुरला.  

हा प्रकार उघड झाल्यानंतर बदनापूरचे तहसीलदार, डॉक्टर्स पोलिसांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरुन शवविच्छेदन करण्यात आले व नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि. बाबासाहेब बोरसे, ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, सुभाष पवार, किरण चव्हाण, सचिन आर्य यांनी या खुनाचा छडा  लावला.

हातावर गोंदल्याने ओळख पटली
गणेश अलंकार याच्या मृतदेहाची तपासणी करताना कुठलीच ओळख पोलिसांना सापडत नव्हती. शेवटी, एका पोलिसाने त्याच्या हातावर बारीक अक्षरात गणेश असे नाव गोंदले असल्याचे सांगितले. त्यावरून ओळख पटली.

पत्नी गेली होती माहेरी
गणेशला मारहाण करण्यात आली, त्यावेळी त्याची पत्नी माहेरी गेली होती. गणेशच्या पश्चात पत्नी एक मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा खून केवळ दाऊ पिऊन गोंधळ घातल्यानेच करण्यात आला असे नसून, अनैतिक संबंधितांचीही किनार यामागे असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आईसमोरच केली मारहाण
या गंभीर प्रकरणात स्वत:चा मुलगा गणेश अलंकार  याला आईसमोर चुलत्यासह अन्य नातेवाईकांनी मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे माहीत असताना मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार आईनेच पोलिसांना दिली. 

Web Title: uncle, cousins killed young man due to his alcoholism and dispute over land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.