शासकीय कार्यालयात फोनवर 'वंदे मातरम' म्हणणं काही चुकीचं नाही; रावसाहेब दानवेंकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:48 PM2022-08-16T13:48:27+5:302022-08-16T13:48:34+5:30
आता शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे.
जालना- आता शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही या निर्णयाचं स्वागत करत या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
फोनवर नमस्कार ऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्यात गैर काय असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. शिवाय ज्याला देशाप्रती स्वाभिमान आहे, ते वंदे मातरम म्हणतील. मात्र असा कोणताही अध्यादेश सरकारने काढला नाही, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. या निर्णयाला रजा अकादमीने विरोध केलाय. यावर देखील दानवे यांनी भाष्य करत ज्याला विरोध करायचा आहे त्याला फोनवर काय म्हणायचे आहे ते म्हणावे. पण मुनगंटीवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे असं सांगत दानवे यांनी या निर्णयाच समर्थन केल.
आज दानवे यांच्या हस्ते जालन्यातील रेल्वे स्थानकावर १०० फुटाचा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विनायक मेटे यांचं अपघाती निधन ही दुर्दैवी घटना आहे. हा अपघात आहे की घातपात याची पोलीस चौकशी करत असून ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच हा घातपात आहे की नाही, याचा सुगावा लागेल असं दानवे यांनी म्हटलंय.