Video: शिवसेना पक्षातून १२ खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:53 PM2022-07-11T17:53:17+5:302022-07-11T17:53:26+5:30
रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला.
जालना/मुंबई- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडली होती. त्यानंतर आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपाकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा यशवंत सिन्हा यांनाच राहावा, अशी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची इच्छा होती. मात्र मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी भाजपाच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका मांडली. त्यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
१२ खासदार शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटातील नेत्यांशी चर्चा करु आणि त्यांना आगामी निवडणुकीत सहभागी करू, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. राष्ट्रपतीपदासाठी उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना देत असतील तर आम्ही त्यांच स्वागत करु, असं मत देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
जालना- केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. pic.twitter.com/RwIvkIorRx
— Lokmat (@lokmat) July 11, 2022
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही सर्व खासदारांसोबत बोलून नक्की कोणाला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्व खासदारांचं मत जाणून घेतलं.