परीक्षा काळातच विद्यापीठ निवडणुका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:56 AM2018-02-25T00:56:37+5:302018-02-25T00:56:41+5:30
शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यास एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. त्यातच १ मार्च पासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होत असून, ऐन परीक्षा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अजब फतवा काढत महाविद्यालय स्थानिक पातळीवरील निवडण्यात येणा-या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यास एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. त्यातच १ मार्च पासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होत असून, ऐन परीक्षा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अजब फतवा काढत महाविद्यालय स्थानिक पातळीवरील निवडण्यात येणा-या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा २०१७ च्या कलम ९९ अ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद गठीत करण्या बाबत २२ फेब्रुवारीच्या पत्रानुसार आदेशीत केले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे पत्र महाविद्यालय पातळीवर दोन दिवसापूर्वीच मिळाल्याचे सूत्रांकडून माहिती आहे. मात्र, या निवडणूकीच्या काळात विद्यापीठ परीक्षा विभाग यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक परीक्षेला १ ते १४ मार्चपर्यंत चालणार असून, यानंतर लगेच १६ मार्चपासून पदवीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला देखील लागले आहे.
आशावेळी या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा फायदा विद्यार्थी यांना कितपत होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडणे साहजिक आहे.
निवडणूक प्रक्रिया २३ मार्च पासून सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालय स्तरावर ३ मार्च रोजी विद्यार्थी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ६ मार्च रोजी आक्षेप, छाननी व अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. ८ मार्च रोजी सचिवपदाकरीता नाव नोंदविण्यात येऊन १५ मार्च रोजी सचिव पदाची निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा अहवाल १७ मार्च रोजी विद्यापीठ संचालक विभाग यांना सादर करण्यात येणार आहे. मात्र, या निवडणुकीची गुणवंत विद्यार्थी यांना माहिती नसून ही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा लागणार आहे.