दुष्काळात तेरावा महिना; अज्ञाताने शेतातील ७०० मोसंबीची रोपे उपटून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:59 PM2019-04-22T15:59:31+5:302019-04-22T16:04:08+5:30
रोपे उपटून फेकत शेतातील कृषी साहित्याचेही नुकसान करण्यात आले आहे
वडीगोद्री (जालना ) : पाच एकर बागेतील ७०० मोसंबीचे रोपे अज्ञाताने उपटून फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी ( दि. २१) मध्यरात्री दाढेगाव शिवारात घडली. ऐन भरात आलेली बाग नेस्तेनाबुत झाल्याने शेतकऱ्याचे १० ते १२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे उमेश संदीपान गव्हाणे यांची शेती आहे. गट क्र. १७८ मधील पाच एकर शेतीत त्यांनी मोसंबीची ७०० रोपे लावली होती. भीषण दुष्काळातही गव्हाणे यांनी ठिबक सिंचनचा वापर करून सर्व रोपे जगवली. रोपांची चांगली वाढ झाल्याने बाग फुलून दिसत होती. मात्र, रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मोसंबी झाडे रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने उपटून फेकली.
घटनेची माहिती प्राप्त होताच गोंदी पोलिसांना घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उमेश गव्हाणे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी म्हणून आशपाक फतरु सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मार्चलासुद्धा गव्हाणे यांच्या शेतातील विद्युत केबल, मोटार, ठिबक आदी शेतीस आवश्यक साधनांची तोडफोड करण्यात झाली होती. याबाबत गुन्हाही दाखल झाला होता. याच वेळी पोलिसांनी तपास केला असता तर आज नुकसान टळले असते अशी खंत हतबल झालेल्या गव्हाणे यांनी व्यक्त केली.