धुळे-सोलापूर महामार्गावर अज्ञातांनी फोडली बस; अंकुशनगर साखर कारखान्याजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:02 PM2024-06-21T19:02:25+5:302024-06-21T19:03:46+5:30
घटनेनंतर शहागड बस स्थानकातून पोलीस बंदोबस्तात केल्या बस रवाना
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. यात बसच्या समोरच्या काचा फुटल्या आहे. ही घटना धुळे ते सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर (महाकाळा) अंकुशनगर साखर कारखान्याजवळ येथे दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.
छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक १ ची बस बीडकडे चालक के. एस. ढगे व वाहक प्रतिभा पाटील घेऊन जात होते. बस अंकुशनगर साखर कारखान्याजवळ आली असता अज्ञात व्यक्तींनी गाडीवर दगडफेक केली. यात बसची समोरील आणि वाहकाच्या बाजूची काच फुटली. यात बसचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी बसमध्ये ३२ प्रवासी प्रवास करत होते. यात कोणालाही काही दुखापत झाली नाही.
बसवर दगडफेक झाल्याची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. अज्ञातांनी बस फोडल्याने या मार्गे येणाऱ्या बस शहागड बसस्थानक येथे थांबवण्यात आल्या होत्या. काहीवेळाने दहा ते बारा बस पोलिसांच्या बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या.