अस्मानी कहर; जालना जिल्ह्यात 'अवकाळी'मुळे ११५ कोटींची पिके उद्ध्वस्त !
By विजय मुंडे | Published: December 15, 2023 08:14 PM2023-12-15T20:14:54+5:302023-12-15T20:15:10+5:30
जालना जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार शेतकऱ्यांना फटका
जालना : वादळी वारे, गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील रब्बी पिकांसह फळपिके, बगायती क्षेत्राला फटका बसला आहे. यात जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांचे ११५ कोटी ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल असून, या नुकसानीची भरपाई म्हणून निधीची मागणीही शासनस्तरावर केली जाणार आहे.
एकीकडे अवेळी पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. तर, दुसरीकडे रब्बी हंगामावर असलेली आशाही अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे मावळली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांसह रब्बीतील पिके, फळपिके व बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले होते. शासनस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार प्रशासकीय यंत्रणेने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा फटका एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांना बसला असून, त्यांचे जवळपास ११५ कोटी ४० लाख ९४ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपेक्षित निधीची मागणीही प्रशासकीय पातळीवरून शासनाकडे करण्यात आली आहे.
जिरायती पिके उद्धवस्त
अवकाळी पावसामुळे एक लाख ४ हजार ७०१.८० हेक्टरवरील जिरायती पिके उद्ध्वस्त झाली असून, त्यात जवळपास ८८ कोटी ९९ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ १० हजार १७९ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला असून, यात २२ कोटी ९० लाखांचे नुकसान झाले आहे. तर, २०६४.४५ हेक्टरवरील बागायती क्षेत्राला फटका बसला असून, यात ३ काेटी ५० लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आता निधीची प्रतीक्षा
गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे ही स्थिती पाहता २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जात आहे. त्यानुसार जवळपास ११५ कोटी ४० लाख रूपयांची नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. प्रशासकीय पातळीवरून मागणी नोंदविल्यानंतर मात्र शासनस्तरावरून मदत मिळणार कधी, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.