अवकाळीच्या तडाख्याने कच्च्या विटांचा झाला चिखल; वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान
By शिवाजी कदम | Published: November 29, 2023 07:28 PM2023-11-29T19:28:43+5:302023-11-29T19:30:24+5:30
अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कच्च्या मालाच्या विटा झाकण्यासाठी मजुरांची मोठी तारांबळ उडाली.
शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तडाख्यामुळे शेती पिकांसह वीट उत्पादकांनी बनवलेल्या कच्च्या विटांचा अक्षरश: चिखल झाला आहे.
अंबड तालुक्यातील गोंदी महसूल मंडळामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीच्या तडाख्यातून वीटभट्टी चालक वाचू शकले नाहीत. परिसरात वीट भट्टी चालकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
पावसामुळे विटांचा चिखल
परिसरात जवळपास २० ते ३० वीटभट्ट्या आहेत. प्रत्येक वीटभट्टीवर सुमारे पाच मजूर काम करत आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे वीटभट्टी चालवणाऱ्यांसह येथे काम करणाऱ्या मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळा सुरू झाला की, विटा बनवण्याची लगबग सुरू होते. यासाठी कच्च्या मातीला आकार देऊन तिला विटांमध्ये रूपांतरित केले जाते. यानंतर भट्टी पेटवून त्यावर कच्च्या विटा भाजण्यात येतात. परंतु, कच्च्या विटा लावतानाच अवकाळी पावसामुळे विटांचा चिखल झाला आहे.
हंगाम तोट्यात
उत्पादक मजुरांच्या साहाय्याने कच्च्या विटा बनवून त्या वाळवून, भाजून पक्क्या करत असतात. शहागडच्या वीटभट्टी चालकांनी लाखोंच्या संख्येने कच्च्या मालाच्या विटा बनवून वाळण्यासाठी ठेवल्या होत्या. सोमवारी पहाटे अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कच्च्या मालाच्या विटा झाकण्यासाठी मजुरांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे वीटभट्टी चालकांचा यंदा हंगाम तोट्यात गेला आहे.
शासकीय मदत द्यावी
पावसामुळे कच्च्या मालाच्या विटांचा अक्षरशः चिखल होऊन, लाखोंचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने वीटभट्ट्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून द्यावी.
- वसंत सापटे, अध्यक्ष, वीटभट्टी चालक-मालक संघटना