"शेतकऱ्यांना तातडीने मदत करा..."; मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषिमंत्री मुंडेंना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 07:05 PM2024-09-04T19:05:04+5:302024-09-04T19:05:37+5:30
मनोज जरांगे यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी
वडीगोद्री ( जालना) : मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी सूरु आहे. घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव या गावांमध्ये दुपारी त्यांनी पाहणी केली. थेट चिखलामध्ये जात जरांगे यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली.
पुणे आणि माणगाव येथील दौरा करून मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे आज आगमन झाले. जरांगे यांनी लागलीच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जरांगे यांनी पाहणी दौरा सुरू केला आहे. बांधावर न जाता थेट गुटघाभर चिखलात जाऊन त्यांनी पाहणी केली. आज जितकं शक्य होईल तितकं शेतकऱ्यांच झालेल नुकसान बघणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहून जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका शेतामधूनच फोन केला. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती त्यांनी यावेळी कृषिमंत्र्यांकडे केली. कृषिमंत्री मुंडे यांनी देखील सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचा आश्वासन दिल्याचे जरांगे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनो, काळजी करू नका
"शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई यांच्या छाताडावर बसून घेणार आहे." असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले की, "आज जितके शक्य आहे, तितके मी फिरणार आहे. मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेईन, जे रस्त्यात दिसेल त्या नुकसानीची मी पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार."