ऊस लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:24 AM2020-12-25T04:24:56+5:302020-12-25T04:24:56+5:30
फोटो वडीगाद्री : अंबड तालुक्यातील गहिनीनाथनगर येथील शेतकऱ्यांनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक यंत्रणेद्वारे उसाची लागवड सुरू केली आहे. ...
फोटो
वडीगाद्री : अंबड तालुक्यातील गहिनीनाथनगर येथील शेतकऱ्यांनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक यंत्रणेद्वारे उसाची लागवड सुरू केली आहे. याद्वारे वेळ आणि पैशाची बचत होत आहे. तीन एकर क्षेत्रांत अवघ्या दोन दिवसांत लागवड करण्यात आली आहे.
काम कोणतेही असो सध्या मजुरांची टंचाई जाणवत आहे. जर मजूर मिळाले तर ते मजुरी मोठ्या प्रमाणात मागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. सद्यस्थितीत महिला मजूर १५० ते २०० रुपये व पुरुष मजुरांना २५० ते ३०० मजुरी देवूनही ते वेळेवर कामाला मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्यांसोबत कामे करावी लागत आहेत. मजूर मिळत नसल्याने कामेही वेळेवर होत नाहीत. उसाची लागवड करायची म्हटले तर मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. या कामातही मजुरांची उपलब्धता होत नाही. त्यामुळे गहिनीनाथनगर येथील शेतकरी उद्धव मुरलीधर मिसाळ, शारदा उद्धव मिसाळ या दाम्पत्यांनी मजुराच्या प्रश्नांवर मात करीत ट्रॅक्टरच्या सहायाने तीन एकरांत उसाची लागवड केली आहे. मिसाळ यांच्याकडे स्वत:चे ट्रॅक्टर असून, प्रथम मोकळ्या रानात चार फुटांवर सरी पाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी त्या सरींवर यंत्राच्या सहायाने लेझरवर तीनच्या पाईपचे पाच फुटांचे तुकडे बसवून त्या पाईपद्वारे चार फुटावर पडलेल्या कांड्याद्वारे उसाची लागवड केली. त्यामुळे ऊस खांडून सरीवर टिपरे अंथरण्यासठी व दाबण्यासाठी काम करणाऱ्या मजुरांची गरज भासली नाही. त्यांनी दोन दिवसांत या उसाची लागवड केली आहे.
प्रतिक्रिया
प्रारंभी पूर्ण उसाचे तुकडे करून घेतले. त्यानंतर सरीयंत्रावर पाईप बसवून पाईपद्वारे उसाचे तुकडे अंथरून दोन दिवसांत लागवड पूर्ण केली आहे. मजूर कामाला लावले असते तर किमान आठ दिवस उसाची लागवड करण्यास गेले असते आणि खर्चही अधिक आला असता. माझ्या कुटुंबातील सदस्य व एक मजुराच्या साहाय्याने उसाची लागवड केली आहे.
उध्दव मिसाळ
शेतकरी, गहिनीनाथनगर