पाणी जपून वापरा, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा
By विजय मुंडे | Published: April 4, 2023 04:37 PM2023-04-04T16:37:34+5:302023-04-04T16:37:55+5:30
टंचाई निवारणार्थ सहा कोटींचा आराखडा; मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के उपयुक्त साठा
जालना : जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांमध्ये ३५.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यात मध्यम प्रकल्पात ४० टक्के तर लघू प्रकल्पांत ३५.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. संभाव्य पाणीटंचाई पाहता जिल्हा प्रशासनाकडून सहा कोटी ४४ लाखांचा टंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे.
गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प व ५७ लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. नंतरच्या काळात शेतीसह ग्रामीण भाग, शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्पांतून पाण्याचा उपसा झाला आहे. यंदा फेब्रुवारी, मार्च या महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक जाणवली नाही; परंतु, एप्रिलच्या प्रारंभी उन्हाचा पारा ३६ अंशाच्या वर गेला आहे. उन्हाच्या वाढत्या झळा आणि प्रकल्पांतील कमी होणारा पाणीसाठा पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने एप्रिल ते जून या कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. ५१४ गावे आणि दोन वाड्यांसाठी ५१५ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यासाठी सहा कोटी ४४ लाख रुपये अंदाजित खर्च लागणार आहे.
यात जालना तालुक्यातील १५५ गावांसाठी एक कोटी ६८ लाख ६६ हजार, बदनापूर तालुक्यातील ६७ गावांसाठी ९४ लाख ५६ हजार, अंबड तालुक्यातील १५ गावे, दोन वाड्यांसाठी ५७ लाख १२ हजार, घनसावंगी तालुक्यातील ५० गावांसाठी ९१ लाख रुपये, मंठा तालुक्यातील ५४ गावांसाठी ५६ लाख ५२ हजार, भोकरदन तालुक्यातील १११ गावांसाठी ९६ लाख तर जाफराबाद तालुक्यातील ६२ गावांसाठी ७९.३२ लाख रुपयांचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
११ प्रकल्पात मृत पाणीसाठा
जिल्ह्यातील ११ प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. १९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणी आहे. १९ प्रकल्पांत २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्तसाठा आहे. तर केवळ १४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती: प्रकल्प उपयुक्तसाठा
कल्याण गिरिजा- ६६.३९%
कल्याण मध्यम - ७३.३२%
अपर दुधना - ५९.६७%
जुई मध्यम - १७.०८%
धामना मध्यम- २५.३८%
जिवरेखा मध्यम - ३१.१६%
गल्हाटी मध्यम ००.००%