४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:38 AM2019-09-27T00:38:54+5:302019-09-27T00:39:20+5:30
जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून हलक्या, मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.९१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा व गोदावरी नद्यांसह इतर नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.
चालू आठवड्यात सतत पडणा-या पावसामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८ मिमी असून, गुरूवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ५०६.४२ मिमी पाऊस झाला आहे. यात जालना महसूल मंडळात १२ मिमी, जालना ग्रामीण २६ मिमी, रामनगर ११ मिमी, विरेगाव १५ मिमी, नेर ३ मिमी, सेवली २५ मिमी, पाचनवडगाव ११ मिमी, वाग्रूळ जहागीर १० मिमी, बदनापूर २९, रोषणगाव १० मिमी, दाभाडी २४ मिमी, सेलगाव ५ मिमी, बावणे पांगरी ५ मिमी पाऊस झाला. तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन ३४ मिमी, सिपोरा बाजार ३० मिमी, धावाडा ५२ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ३४ मिमी, हस्राबाद ४७ मिमी, राजूर ९ मिमी, केदारखेडा ३९ मिमी, आन्वा १० मिमी पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ५ मिमी, टेंभुर्णी १२ मिमी, कुंभारझरी ४ मिमी, वरूड १५ मिमी, माहोरा २० मिमी पाऊस झाला. परतूर ८ मिमी, सातोना २.५० मिमी, आष्टी २८ मिमी, वाटूर १८ मिमी, मंठा २ मिमी, ढोकसाल ३२ मिमी, पांगरी गोसावी ७ मिमी पाऊस झाला. अंबड ७ मिमी, धनगर पिंपरी २० मिमी, जामखेड ४ मिमी, रोहिलागड १२ मिमी, सुखापुरी १० मिमी, घनसावंगी १८ मिमी, राणीउंचेगाव २५ मिमी, रांजणी १२ मिमी, तीर्थपुरी २ मिमी, कुंभारपिंपळगाव १३ मिमी, अंतरवली टेंबी ९ मिमी, जांभ समर्थ २ मिमी पाऊस झाला. दरम्यान, सततच्या पावसामुळे उर्वरित कालावधीत परतीचा पाऊस दमदार हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
गोदावरी नदीपात्रात ४५ हजार क्युसेक्सचा विसर्ग
शहागड : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीच्या धरण क्षेत्रात येणाºया पाण्याची आवक वाढली तर मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास ५० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीपात्र दुथडी वाहत आहे. येथील बंधा-यावर पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पाण्याची आवक वाढल्यानंतर कोणताही धोका होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असून, आपत्ती व्यवस्थापन पथकही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.
जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन, बचाव साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी नदी, नाले, ओढ्यात प्रवेश करू नये.
पुलावरून पाणी वाहत असेल तर वाहने नेऊ नयेत, जनावरांना नदीपात्रात जाऊ देऊ नये, नदीच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये, ग्रामपंचायतींनी दवंडी देऊन नागरिकांना दक्षतेबाबत सूचना द्याव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.