जागा ५०; अर्ज १० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:23 AM2018-03-13T00:23:23+5:302018-03-13T00:25:40+5:30
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अस्थापनेवरील शिपाई पदाच्या ५० जागांसाठी दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. सोमवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अस्थापनेवरील शिपाई पदाच्या ५० जागांसाठी दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. सोमवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बोलाविलेल्या ९२० पैकी ५८१ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. उमेदवारांच्या धावण्याची अचूक वेळ नोंदविण्यासाठी प्रथमच ‘ रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिव्हाईस’ चा (आरएफआयडी) वापर करण्यात आला.
नोकरी मिळविण्याच्या वाढत्या स्पर्धेमुळे पोलीस भरतीकडे तरुणांचा कल वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिपाई पदाच्या मोजक्याच जागांसाठी आलेल्या हजारो अर्जांवरून याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अस्थापनेवरील केवळ ५० जागांसाठी दहा हजार २५० अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये याकरिता पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे दिवसभर मैदानावर हजर होते. सोमवारी पहिल्या दिवशी ९२० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. पैकी ५८० उमेदवार प्रत्यक्षात हजर राहिले. प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. शारीरिक मोजमाप झाल्यानंतर उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी सकाळीच धावण्याची चाचणी घेण्यात आली. यासाठी प्रथमच १६०० मीटर व १०० मीटर धावण्याची अचूक वेळ नोंदविण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिव्हाईसचा वापर करण्यात आला. पुलअॅप्स, उंचउडी, लांब उडी, गोळाफेक इ. चाचण्या घेण्यात आल्या. उमेदवारांना गुणदान पद्धत माहिती व्हावी यासाठी प्रत्येक मैदानी चाचणीला कशाप्रमाणे गुण देण्यात येतील हे दर्शविणारे फलकही मैदानावर लावण्यात आले. मैदानावर सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. उमेदवारांसाठी पिण्यासाठी पाणी, वैद्यकीय सुविधाही मैदानावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डिजिटल साधनांचा वापर
पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मानवी हस्तक्षेप कमी करत डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कोणी भरती प्रक्रियेसाठी पैसे मागत असेल तर उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.
- रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक जालना.