सात महिन्यांत १४ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:50+5:302021-08-12T04:33:50+5:30
विजय बावस्कर वरूड (बु.) : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कंबर ...
विजय बावस्कर
वरूड (बु.) : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने गत सात महिन्यांत १४ हजारांवर नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शिवाय केंद्रांतर्गत १९ गावांमध्ये प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याबाबतही जनजागृती केली जात आहे.
पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावांचा समावेश आहे. यात पिंपळगाव रेणुकाई, रेलगाव, वालसा, बाभूळगाव, चोऱ्हाळा, विरेगाव, कोठा जहागीर, टाकळी, वरुड बु, माळेगाव, लिंगेवाडी, बोरगाव, निबोळा आदी गावांतील ४१ हजार ४१४ नागरिकांना या केंद्रातून आरोग्य सेवा दिली जाते. मार्च व एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण होऊ लागले होते. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात करण्यात आले. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लसीकरणाला प्राधान्य दिले. त्याचा परिणाम म्हणून मागील सात महिन्यांत ११ हजार ३३६ जणांना पहिला तर २ हजार ७१८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या केंद्रांतर्गत एकूण १४ हजार ५४ जणांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, या केंद्रांतर्गत नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु, वरिष्ठ स्तरावरून कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होतो. लस नसल्याने नागरिक येथील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त करतात. ही बाब पाहता वरिष्ठांनी या केंद्राला अधिक प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट
पिंपळगाव रेणुकाई आरोग्य केंद्रांतर्गत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ स्तरावरून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होते त्यानुसार लसीकरणाचे नियोजन केले जाते. नागरिकांनी लसीकरणानंतरही मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करावे.
- डाॅ. सतीश बावस्कर, पिंपळगाव रेणुकाई प्रतिनिधी
फोटो कॅप्शन : लसीकरणासाठी प्रयत्न करणारी पिंपळगाव रेणुकाई आरोग्य केंद्रातील टीम.