१८ ते ४४ वयोगटातील २१ हजार जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:20+5:302021-05-13T04:30:20+5:30
जालना : जालना जिल्ह्यात १ मेपासून आजपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २०८७९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु, लसीकरणाअगोरदर ...
जालना : जालना जिल्ह्यात १ मेपासून आजपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २०८७९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु, लसीकरणाअगोरदर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध होताच बारा वाजता नोंदणी सुरू केली जाते. अवघ्या १० ते १५ मिनिटांत नोंदणी हाऊसफुल्ल होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. लसीकरणाअगोदर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. आरोग्य सेतू व कोविन ॲपवर नोंदणीसाठी नागरिकांची झुंबड उडत असते. दुसरीकडे लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होते. यावेळी नियमांचा फज्जा उडत होता. शिवाय ४५ वर्षांवरील अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा होती. त्यामुळे शासनाने मंगळवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील ९७६०९० जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २०८९९ जणांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे. यात २०७२२ जणांनी पहिला, तर १५७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
कोरोना लस ही एक संजीवनी आहे. ती सर्वांना मिळाली पाहिजे. परंतु सध्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लस मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु, नोंदणीच होत नाही.
आर. एस. राजगुडे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अनेकदा इंटरनेट उपलब्ध नसते. जेव्हा इंटरनेट उपलब्ध असते. तेव्हाच साईट बंद असते. त्यामुळे लॉगिन करण्यासाठी अडचणी येत आहेत. मी अनेकवेळा प्रयत्न केला. परंतु, मला नोंदणी करता आली नाही.
प्रा. विनोद जाधव
मी मागील आठवड्यापासून ऑनलाईन नोंदणीसाठी प्रयत्न करतोय. परंतु, नोंदणीच होत नाही. कधी साईड बंद असते, तर कधी इंटरनेट सेवा विस्कळीत होते.
सागर शेंडगे
१८ ते ४४ वयोगतील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. लस प्राप्त झाल्यानंतरच नोंदणी सुरू केली जात होती. आपल्या जिल्ह्यात १२ वाजता नोंदणी सुरू केली जात होती. आता शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण बंद केले असून, केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण ठेवण्यात आले आहे.
संतोष कडले, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, जि. प., जालना