हिवरारोषणगाव येथे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:26+5:302021-05-13T04:30:26+5:30
आरोग्य केंद्रात सिंगल फेज देण्याची मागणी अंबड : अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री आरोग्य केंद्राला देण्यात आलेला रोहित्र गेल्या अनेक ...
आरोग्य केंद्रात सिंगल फेज देण्याची मागणी
अंबड : अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री आरोग्य केंद्राला देण्यात आलेला रोहित्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. वारंवार मागणी करूनही त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात सिंगल फेज देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बठाण येथे आ. गोरंट्याल यांची भेट
जालना : जालना तालुक्यातील बठाण बु येथे सरपंच ज्ञानेश्वर देवडे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्रास आ. कैलास गोरंट्याल यांनी भेट दिली. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोविड लस घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन आ. गोरंट्याल यांनी केले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर देवडे, उपसरपंच सचिन बागल, नारायण पाटेकर, दिनेश बागल, संतोष देवडे, गणेश नरहरी देवडे, जीवन बागल आदींची उपस्थिती होती.
अंत्योदय योजनेच्या अन्न धान्याचा पुरवठा
जालना : जून २०२१ साठी अंत्योदय योजनेचे तालुकानिहाय गहू व तांदूळ नियतन प्राप्त झाले असून, तहसीलदारांनी प्रती कार्ड अंत्योदय गहू व तांदूळ साठ्यानुसार वाटप करावे, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जालना ग्रामीण भागातील ५ हजार ८३४ लाभार्थ्यांसाठी गहू १ हजार ३४५ क्विंटल व तांदूळ ७०० क्विंटल, बदनापूर तालुक्यातील ३ हजार ८४८ लाभार्थ्यांसाठी गहू ८०० क्विंटल व तांदूळ ४०० क्विंटल वाटप करावा.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करा
जालना : दिव्यांगांसाठी जालना शहरातील मध्यवर्ती भागात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा दिव्यांग नियंत्रण समितीचे सदस्य जगदीश येनगुपटला यांनी केली आहे. जालन्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्ती असून, त्यांना लांबपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही.
कोविड १९ जनजागृती पत्रकाचे प्रकाशन
जालना : वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनाची लागण कशी होते, लागण होऊ नये म्हणून आपण कोणती खबरदारी घ्यावी याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे यासाठी कोविड १९ जागृती माहिती पत्रकाचे प्रकाशन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, औषध निर्माण अधिकारी कड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक वाघमारे, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विद्या म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्डचे सचिव पुष्कराज तायडे, विश्वनाथ तोडकर, भूमिपुत्र वाघ, प्रा. सुवर्णा दांडगे, प्रा. डॉ. रामदास निहाळ, माया घोरपडे, भारत खरात आदी उपस्थित होते.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. दारूमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शिवाय महिलांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चितळी पुतळीत जंतुनाशक फवारणी
जालना : तालुक्यातील चितळी पुतळी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक हायड्रोक्लोराईडची फवारणी केली आहे. यावेळी सरपंच स्वप्ना वांजुळे, बाळासाहेब लगडे, भीमराव लोंढे, महादेव गादगे, विलास जानेवार, बाबुअन्ना कारेगावकर, भिमराव लगडे, भुजंग गावडे, भगवान खटके,अशोक पाटोळे आदी उपस्थित होते.