वैष्णव वाढेकर प्रथम, तर आदिती सुरंगळीकर द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:11 AM2019-08-27T01:11:04+5:302019-08-27T01:12:50+5:30
महाराष्ट्रावर बोलू काही .... युवा जागर ‘युवा संसद’ स्पर्धेची जिल्हाफेरी सोमवारी पार पडली. या स्पर्धेत वैष्णव वाढेकर प्रथम, आदीती सुरंगळीकर दितीय तर तेजस नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्रावर बोलू काही .... युवा जागर ‘युवा संसद’ स्पर्धेची जिल्हाफेरी सोमवारी पार पडली. या स्पर्धेत वैष्णव वाढेकर प्रथम, आदीती सुरंगळीकर दितीय तर तेजस नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकविला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील २४ स्पर्धकांनी विविध सामाजिक विषयांवर विचार मंथन केले. जालना जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या जिल्हाफेरीचे उद्घाटन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी मंगल धुपे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड, उपशिक्षणाधिकारी रमेश तांगडे, डॉ. सुहास सदाव्रते, प्रा. दिगंबर दाते, रंगनाथ खेडेकर, प्राचार्य कांबळे, प्रा. संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा फेरीत २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी स्वच्छ भारत मिशन, पीकविमा, उज्ज्वला योजना अशा १४ शासकीय योजनांवर विचार मंथन केले. यात वैष्णव वाढेकर प्रथम, आदिती सुरंगळीकर द्वितीय तर तेजस नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकविला. हे स्पर्धक मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. अशोक पाठक, प्रा. डॉ. सुजाता देवरे, डॉ. कैलास इंगळे यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. सुहास सदाव्रते, प्रा. रंगनाथ खेडेकर, प्रा. दिगंबर दाते, प्रा. संजय चौधरी, डॉ. विद्या दिवटे, डॉ. विजय कुमठेकर, प्रा. अशोक आहेर, डॉ. प्रभाकर शेळके आदींनी परिश्रम घेतले.
सत्राच्या दुस-या टप्प्यात प्रश्न, उत्तराचा तास घेण्यात आला. यात विरोधकांनी स्थानिक प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यात दुष्काळ, पाणी इ. विषयांवरुन विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरले होते. तर सत्ताधारी पक्षानेही विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अनुभवले सभागृहाचे कामकाज
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधानसभा सभागृहाचे कामकाज कसे चालते. याचा अनुभव मिळावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा फेरीमध्ये विधानसभा सभागृहात ज्याप्रमाणे कामकाज चालते. त्याचप्रमाणे अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली.
यात अध्यक्ष म्हणून मोनिका जाधव, सभागृह नेता वैष्णव वाढेकर, विरोधी पक्षनेता तेजस नांगरे, मंत्री आदिती सुरंगळीकर, ऋषिकेश मोरे, तरन्नुम फेरोज बेग, संध्या व्यवहारे, राहुल गोंडगे, उजमा शेख, सतीश पाटोळे तर विरोधी गटामध्ये पवन मोरे, योगेश वैद्य, रेणुका शिंदे आदी सहभागी होते.